कविता - मला माणूस पाहिजे
|| मला माणूस पाहिजे ।
एक होते मंदिर,उंच डोंगरावर
कीर्ती त्याची दूरदूर,गर्दी होतसे भरपूर ।।धृ ।।
एके दिवशी देवळाचा पुजारी गेला देवाघरी
कोण असेल लायक दुसरा उभा राहण्या गाभारी
साधू एक होता तेथे महान,केली त्याने घोषणा
उद्या परीक्षा होईल कोण पात्र त्या भूषणा १
भल्या पहाटे ब्राह्मण चढू लागले डोंगर तो अवघड
किती कष्टाचा तो रस्ता किती काटे धोंडे दगड
परीक्षेत साधूने विचारले वेगवेगळे प्रश्न
तरी निवडावे कुणाला साधुलाच पडला प्रश्न २
एक तरुण गरीब ब्राह्मण अगदी शेवटी आला
वेळेची किंमत का नाही,उशीर केवढा झाला
म्हणे हात जोडोनि तो त्यात चूक माझी नाही
चढताना भक्तजनांचे हाल बघवले नाही ३
आलो सारे दगड धोंडे साफसूफ करून
क्षमा करा आता परततो देवदर्शन घेऊन
साधू विचारी प्रेमाने जाणतोस का वेद मंत्र
म्हणे मी अडाणी ठाऊक ना पूजेचेही तंत्र ४
हास्यकल्लोळ एकच सर्व ज्ञानिजनांत उडाला
कसा करावा पुजारी तुझ्यासारख्या मूर्खाला
पण साधू म्हणे देवासाठी असलाच पुजारी पाहिजे
स्वार्थ पाहती पशु ,मला पूजेसाठी माणूस पाहिजे ५
करा विचार थोडा आपल्यात आहे का माणूस ?
सुहास सांबरे
दि. 17.05.2001
Mala Manus Pahije
छान
ReplyDelete