खरा मित्र ज्ञानदेव
माझं बालपण आणि सातवी पर्यंत चे शिक्षण झरेकाठी या निसर्गरम्य गावात गेलं.मी सहावीत शिकत असताना एक अशी घटना घडली जी मी कधीच विसरू शकणार नाही. माझे आईवडील दोघेही शिक्षक होते आणि आमच्या शाळेची वेळ सकाळी 7.30 ते 10.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशी असायची. माझ्या वर्गात तीस विद्यार्थी होते पण ज्ञानदेव खंडोबा वाणी हा माझा सर्वात जवळचा आणि शाळेतील एकमेव मित्र होता. त्याचे घर शाळेपासून खूप दूर बिबाई च्या डोंगराच्या पायथ्याशी होते,घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती. तो सकाळीच त्याचा जेवणाचा डबा घेऊन यायचा आणि दुपारी रोज आमच्या घरी थांबायचा. मग दुपारी आम्ही आमच्या घरी बरोबर जेवायचो,अभ्यास करायचो आणि खेळायचो.तसा तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता,कारण मला लवकर चार वर्ष वय असताना शाळेत घातले होते. माझा लहान भाऊ हेमंत उर्फ सोन्या तेव्हा दुसरीत होता.त्याला 9 वाजता चहा कम्पल्सरी लागायचा,आणि नाही मिळाला तर खूप रडायचा . आणि चालत जायचे म्हटले आमचे घर शाळेपासून दहा मिनिटांवर होते,त्यामुळे मधल्या वीस मिनिटांच्या सुट्टीत घरी जाऊन सोन्याला चहा पाजून आणणे आईला शक्य नसायचे.मग ती कामगिरी मी आणि ज्ञानदेव करायचो.मधली सुट्टी झाली की लगेच आम्ही दोघं वेगाने पळत घरी जायचो. मी रॉकेलचा स्टोव पेटवायला घ्यायचो,तोपर्यंत ज्ञानदेव चहाचे पातेले घेऊन बाकी तयारी करून ठेवायचा.मग चहा झाला की एका कडीच्या स्टीलच्या डब्यात भरून घ्यायचा. मग पुन्हा जमेल तितक्या वेगाने चालत तो गरमागरम चहा आईकडे नेऊन द्यायचो आणि लगेच घंटा वाजली की आमच्या वर्गात जाऊन बसायचो. पण या धावपळीत आम्हा दोघांना मधल्या सुट्टीत इतर मुलांसारखे खेळायला नाही मिळायचे,पण दुपारच्या सुट्टीत मग आम्ही भरपूर खेळायचो.
तर एके दिवशी आमच्या माळी गुरुजींनी आम्हाला थोडं उशिरा सोडलं ,त्यामुळे त्या दिवशी आम्ही नेहमीच्या रस्त्याने न जाता ओढ्यातून एक मधला रस्ता जायचा,तिकडून पळत पळत निघालो.त्या रस्त्याने खूप कमी लोक जायचे कारण तिथे एका वस्तीवर एक भलं मोठं कुत्रं असायचं आणि त्याच्याकडे पाहिलं तरी भीती वाटायची. त्याची नजर चुकवून पुढं जाऊ असा विचार करून आम्ही तिथून पळत सुटलो. पण क्षणात एका आडोश्याच्या मागून येऊन त्याने माझ्यावर झडप घातली आणि मला खाली पाडले. आपण रस्त्याने जाताना कुत्रं नुसतं भुंकले तरी आपल्या अंगावर भीतीने सर्रकन काटा येतो. पण अशाही परिस्थितीत तेव्हा बारा तेरा वर्षाचा ज्ञानदेव अजिबात घाबरला नाही की तिथून दूर पळूनही गेला नाही.त्याने त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय धरून त्याला माझ्यापासून दूर ओढले आणि दगड मारून त्याला पळवून लावले. पण तोपर्यंत कुत्र्याने माझ्या डाव्या डोळ्या जवळ जोरात चावा घेतलेला होता. त्या चावल्याची खूण अजुनही माझ्या डोळ्या जवळ तशीच आहे. ज्ञानदेवने ती हिंमत दाखवली नसती तर कदाचित माझा एक डोळा गेला असता. त्यावेळी पिसाळलेलं कुत्रं चावलं की दहा इंजेक्शन घ्यावी लागायची. त्यासाठी मग आमचे वडील ज्यांना आम्ही गुरुजी म्हणूनच हाक मारायचो,ते मला रोज शाळा सुटली की पाच वाजता सहा सात किमी दूर सोनगाव येथील दवाखान्यात सायकल वर डबल सीट घेऊन जायचे.त्यानंतर जवळच एक निळवंडे म्हणून गाव होते,तिथे एक वैद्य एक बारीक औषधी भाकरी खायला द्यायचा,तिथे मला गुरुजी घेऊन गेले.
सातवी पास झाल्यावर ज्ञानदेव सोनगाव च्या हायस्कूल मध्ये गेला, माझी सुद्धा सोनगाव येथील शाळेतच जायची इच्छा होती पण मला आमच्या वडिलांनी आश्र्वी येथील हायस्कूल मध्ये टाकले.त्यामुळे माझी आणि ज्ञानदेव ची आणि खूप प्रिय अशा माझ्या झरेकाठी गावाची ताटातूट झाली. मला तर झरेकाठी सोडल्याचे इतके दुःख झाले की आश्वी शाळेतील मुलांशी मी स्वतः हुन बोलत सुद्धा नसे आणि दहावी पास होईपर्यंत कुणाशी मैत्री सुद्धा केली नाही. झरेकाठीत राहिलो तेवढेच आनंदाचे दिवस होते,त्यानंतर सगळेच बदलून गेले.पण तेंव्हा सुद्धा ज्ञानदेव मला दोन तीन महिन्यातून एकदा तरी एवढ्या दूर वर सायकल चालवत मला भेटायला यायचा. तर अशी ही आमची बालपणीची मैत्री आजही कायम आहे. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात सर्व जण आपल्या शाळा कॉलेजमधील मित्रांना भेटणे तर जाऊ द्या,पण फोनवर निवांत बोलायला देखील वेळ मिळत नाही.
आयुष्यात खरा मित्र मिळणे अत्यंत दुर्मिळ गोष्ट असते आणि देवाच्या कृपेने मला ज्ञानदेव सारखा निर्मळ मनाचा, निःस्वार्थी स्वभावाचा आणि अत्यंत साहसी,शूर मित्र मिळालेला आहे.
Comments
Post a Comment