आधीच हौस,त्यात पडला पाऊस

             माझा तसा नशीब  वगैरे गोष्टींवर विश्वास नाही पण आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की नशीब किंवा योगायोग म्हणून काही असतं की काय असं वाटू लागतं.माझ्या नशिबात सहलीला , फिरायला जाण्याचा योग नाही असं वाटावं अशा घटना घडत गेल्या त्या सगळ्या सांगतो.

' केल्याने देशाटन.... मनुजा चातुर्य येतसे फार ' असं खूप पूर्वी कवी मोरोपंत म्हणून गेले आहेत.यावरून तुमच्या लक्षात येईलच की मी फारसा कुठे फिरलेलो नाही म्हणजे मी चतुर,स्मार्ट वगैरे नाही,बरेच लोक मला सहजपणे फसवतात,पण ते जाऊ द्या,मूळ विषयावर येतो.तर याची सुरुवात आमच्या मराठी शाळेपासून झाली,1ली ते 7 वि मी झरेकाठी या गावात मराठी शाळेत शिकलो,पण संपुर्ण 7 वर्षात तिथे अगदी जवळ कुठेतरी का होईना पण सहल निघालीच नाही.मग तिथे पुढील वर्ग नसल्याने मी आश्वि च्या हायस्कूलला 8 वीला प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी आमच्या झरेकाठीच्या शाळेची 5 वि ते 7 वीच्या मुलांची 3 दिवसांची सहल किल्ले पाहण्यासाठी निघाली.

     इकडे हायस्कूलला पण तीच तऱ्हा,मी 10 वि पास होईपर्यंत तीन वर्षात काहीतरी कारणाने एकही सहल निघाली नाही,आणि मी 11वी साठी संगमनेरला गेलो,त्याच वर्षी इकडे आश्वि हायस्कूलची 5 दिवसाची मोठी सहल गेली त्यात माझी लहान बहीण आणि भाऊ पण जाऊन आले.

     मग 11 वीच्या प्रवेशासाठी वडील बाहेरगावी गेल्याने आयुष्यात प्रथमच एकटा संगमनेरला गेलो.दहावीचं मार्कशीट घेऊन रांगेत उभा राहिलो.इतर सर्व मुलांबरोबर कुणीतरी मोठं माणूस होतं,मी मात्र एकटाच आणि ऍडमिशन ची माहिती तर काहीच नाही.माझा नंबर आल्यावर सरांनी विचारले,कुठल्या साईड ला ऍडमिशन घेणार,मी म्हणालो माहीत नाही.मग त्यांनी मार्कशीट पाहिलं आणि म्हणाले,80 टक्के मार्क म्हणजे सायन्सला घे,मी म्हणालो चालेल,मग त्यांनी विचारलं सायन्समध्ये maths किंवा agrichulture ऑपशन आहे,कुठलं घेणार ?. मी तोपर्यंत agriculture हा शब्द ऐकलाच नव्हता म्हणून म्हणालो Maths द्या आणि 25 रुपये भरून ऍडमिशन झालं. नंतर 11,12 वी कधी संपली काही समजलंच नाही,तिथेही कुठेच जाणं झालं नाही.

     मग 12वी सायन्स पास झाल्यावर कुठे जायचं असतं हे फारसं काही माहीत नसल्याने आणि वडिलांच्या आग्रहाने आमचं ऍडमिशन सरळ इंजिनिअरिंगला झालं.इथे मात्र कॉलेजच्या 3 ऱ्या वर्षी सहल म्हणून नाही पण industrial visit म्हणून थेट वडोदरा,गुजरात येथे जायला मिळालं,पण तिथेही एक वेगळीच फजिती झाली.सकाळी 10 वाजता जनरल मोटर्सचा प्लॅन्ट बघायला आम्ही गेटवर पोहोचलो,तर तिथे मला आणि माझ्या एका मित्राला सोडून सगळ्यांना आत घेतलं,कारण काय तर आमच्या पायात शूज नव्हते,आम्ही दोघे चपला घालून आलो होतो.आमचे गुरुजन आणि मित्र आम्हाला दोघांना सोडून आत निघून गेले.आम्हाला कळेना आता बाहेर चार पाच तास गेटवर आम्ही काय करणार ? एक तर हा प्लॅन्ट शहरापासून 15 किमी दूर होता.शेवटी त्या सेक्युरिटीला म्हणालो चपला चालत नसतील तर त्या काढून अनवाणी जातो,तर तो म्हणाला इथं शूज कंपल्सरीआहे,आम्ही नाही सोडू शकत.मग मला दुसरी आयडिया सुचली.तिथं चार पाच गार्ड होते,म्हटलं थोडावेळ तुमचे शूज द्या,म्हणजे आम्हाला आतून कंपनी पाहायला तरी मिळेल,पण त्यांनी साफ नकार दिला.मग अर्धा तास तसेच बसून होतो.मग आतून एक कार आली,त्यात एक कंपनीचा मोठा ऑफिसर होता,मग त्यांना विनंती केली काहितरी मार्ग काढा.मग ते आम्हाला म्हणाले,मी तुम्हाला माझ्या गाडीतून शहरात सोडतो,मग तुम्ही नवीन शूज घ्या आणि मग परत येऊन कंपनी बघा.मग काय आम्ही दोघे त्या आलिशान कार मध्ये बसलो आणि 10 मिनिटात बडोद्यात आलो,तर खिशात दोघांकडे मिळून फक्त 130 रुपयेच होते.मग 50 रुपयात सगळ्यात हलक्या दर्जाचे शूज घेतले आणि रिक्षा करून परत कंपनीत पोहोचलो.प्रवासाने अनुभव मिळतात,शहाणपण येतं हे अगदी उदाहरणा सहित पटलं.

नंतर इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर आतापर्यंत दिशाहीन चाललेलं आयुष्य अजूनच दिशाहीन झालं.मग काहीतरी केलं तर पाहिजे म्हणून इन्शुरन्समध्ये जॉब ला सुरुवात केली,मग त्यानंतर वर्षाच्या आत लग्न झालं.इथं मात्र बहुतेक देवाला दया आली आणि मला थोडं तरी फिरायला मिळावं म्हणून बहुदा सासुरवाडी 300 किमी दूरची पाहून दिली.(ज्याची सासुरवाडी 300 किमी पेक्षा लांब असते तो सुखी असतो ,असं कुठंतरी व्हाट्सएप वर वाचलं होतं).वर्षातून एकदा तरी तेवढं फिरायला मिळतंच,पण त्याला फिरणं तरी कसं म्हणावं ?


आता इथुनपुढे मी जे सांगणार आहे त्यावरून वाचकांना नशीब किंवा योगायोग कसा असतो याचा अंदाज येईल.इथून पुढची आठ दहा वर्ष आई,वडील आणि लहान बहिणीच्या आजारपणात असा गुरफटलो की सगळ्या सुट्ट्या,रजा त्यातच जायला लागल्या आणि स्वतःहून कुठे फिरायला जाणं होईना.फक्त एकदा कोकणात दोन तीन दिवसासाठी पत्नी आणि मुलासह समुद्रकिनारे वगैरे फिरून आलो.

     2018 मध्ये Metlife कंपनीत जॉईन झालो.माझ्या आधी जॉईन झालेले लोक ट्रेनिंगसाठी बंगलोरला जाऊन आलेले होते.मला अहमदाबादला पाठवणार होते,विमानाचं तिकीतही बुक झालं, पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ट्रेनिंग कॅन्सल झालं आणि मी पुण्यातच राहिलो आणि मग माझ्याच कारने मुंबईला जाऊन ट्रेनिंग पूर्ण केली.विशेष म्हणजे माझ्यानंतर 10 दिवसांनी जॉईन झालेले दोन जण मात्र कोलकाता इथं ट्रेनिंगसाठी जाऊन आले. पुन्हा तेच घडलं जे आजपर्यंत घडत आलं होतं.  

     2019 च्या जून नंतर असा काही परफॉर्मन्स झाला की प्रत्येक महिन्यात एकेक फॉरेन ट्रिप मिळायला लागली.

   1. लंडन 4 दिवस, 

   2. स्पेन पोर्तुगाल 4 दिवस,

   3. दुबई 2 दिवस,

   4. स्वित्झर्लंड 3 दिवस 3 जणांसाठी आणि

   5.  मग मार्च 2020 ला न्यूयॉर्क,वॉशिंग्टन 6 दिवसाची ट्रीप मिळाली.

   आता एवढ्या पाच ट्रिप पैकी निदान स्वित्झर्लंडची ट्रिप पत्नी मुलासह करायचीच असं मी पक्के ठरविलं आणि तशा तयारीला लागलो आणि इथं मात्र मी ट्रीपला जाऊ नये म्हणून बहुधा जागतिक पातळीवर कारस्थान करण्यात आलं आणि माझी ट्रिप रद्द करण्यासाठी जगभर कोरोना पसरला आणि 20 मार्च 2020 ला पूर्ण भारत भर संपूर्ण लॉक डाऊन लागू झालं. मग काय देश परदेश बाजूलाच राहिला,इथं घराबाहेर एक पाऊल पडणंही अशक्य होऊन गेलं.आमच्या कंपनीने सर्व ट्रिप कॅन्सल केल्या आणि अशा रितीने पुन्हा एकदा मी फिरायला जाण्यापासून वंचित राहिलो.

   माझी ही फिरण्याची कथा ऐकून तुमचं डोकं फिरायच्या आत मी ही कथा इथंच थांबवतो.हा लेख मी पहाटे 3 वाजता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये बसून लिहितो आहे,आमचे वडील ऍडमिट आहेत. हेही एक कारण आहे त्यामुळे मी सुट्टी घेऊन फिरायला जाऊ शकलेलो नाही,कारण दवाखाने करता करताच सुट्ट्या संपून जातात.

   ता.क. - जगप्रसिद्ध शिर्डी देवस्थान आमच्या गावापासून फक्त 22 किमी दूर आहे,पण तिथेही मी फक्त एकदाच गेलो आहे.


सुहास सांबरे

दि. 30/09/2021

ठिकाण- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल

Comments

Popular posts from this blog

खरा मित्र ज्ञानदेव

कविता - मला माणूस पाहिजे

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे