आपला तो बाब्या,दुसऱ्याचं ते कार्ट
आहे जगाची रीत जुनी,ज्याला त्याला वाटतं ।
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।।धृ ।।
पक्ष सोडूनि जाणारा दलबदलू तो हरामखोर
पक्षात कुणी येता नवा,मतपरिवर्तन ते असते थोर
संधी साधू हे राजकारण ज्याला त्याला कळतं
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।। १ ।।
मुलीच्या लग्नात बापाला आठवे हुंडाविरोधी कायदा
मुलाच्या लग्नात मात्र पाहावा लागतो होणारा फायदा
खायचे अन दाखवायचे वेगळेच असतात दात
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।।२।।
कोणी खाता पैसे म्हणशी अगदीच नाही त्याला लाज
स्वतः मात्र संधी साधून म्हणतो त्याला माझा नाईलाज
आपल्या अंगावर आलेलं ढकलायचं असतं
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।।३।।
मुलगी सासरी जाता वाटे तिच्या सासूने करावे काम
पण इकडे सुनेने काम करूनी द्यावा सासूला आराम
असं उलट सुलट सुलट उलट यांचं
डोकं तरी कसं चालतं
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।। ४।।
दि. ५ जून २००७
Comments
Post a Comment