प्रभु श्रीरामाची कृतज्ञता बुद्धी
आज २२ जानेवारी २०२४,
रामजन्मभूमी वर आज रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे.पाचशे वर्षांचा दीर्घ आणि प्रचंड संघर्ष केल्यावर आज हा अलौकिक दिवस उगवला आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत की आपल्याला हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य लाभले आहे.गेल्या पाचशे वर्षात असंख्य राम भक्तांनी यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे,त्या सर्वांचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.श्रीरामाचे आयुष्य म्हणजे आदर्श गुणांनी भरलेले आयुष्य,आणि अशा असंख्य गुणांपैकी एक महत्वाचा गुण म्हणजे आपण आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे . प्रभू श्रीराम यांच्या याच गुणाविषयी मला या लेखात काही सांगायचे आहे.
रामायणात असे अनेक प्रसंग असे आहेत ज्यातून आपल्याला रामाचा हा सद्गुण दिसून येतो . सेतू बांधत असताना अनेक शक्तिशाली वानर मोठमोठ्या शिळा उचलून आणत होते आणि त्या सेतूच्या बांधकामात वापरल्या जात होत्या.त्याचवेळी रामाला तिथे एक खार काहीतरी धावपळ करताना दिसली.ती खार मातीत जाऊन लोळत होती आणि नंतर त्या सेतुवर जाऊन अंग झटकत होती.रामाने तिला विचारले की हे तू काय करत आहेस.त्यावर ती म्हणाली की तुमच्या या कामात मी थोडी थोडी माती आणून माझ्या परीने मदत करत आहे.रामाला खूप कौतुक वाटले आणि त्याने तिला हातावर घेऊन मायेने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि कृतज्ञता व्यक्त केली. असे म्हटले जाते की रामाने खारीच्या पाठीवर फिरवलेली ती बोटे आजही दिसतात. अर्थात ही एक रूपक कथा आहे.पण त्यातुन असा बोध मिळतो की राम आपल्याबरोबर असलेल्या प्रत्येकाची किती काळजी घेत असला पाहिजे आणि कुठलेही काम किंवा मदत ,मग ते छोटे असो की मोठे,त्याबद्दल त्याचे कौतुक करून त्यांना आपलेसे करून घेत असेल. म्हणून तर आजही हजारो वर्षांनी सुद्धा संपूर्ण जगभर रामकथा ऐकवल्या जातात, गायल्या जातात आणि आज तर 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत जगात कोठे झाला नसेल असा भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे.
अजून एक दुसरा प्रसंग.लक्ष्मणाने आयुष्यभर स्वतःचे वैयक्तिक आयुष्य विसरून केवळ रामाची सेवा केली. हनुमानाला आपण रामाचा सर्वश्रेष्ठ भक्त मानतो,पण जेव्हा लक्ष्मण युद्धात मूर्च्छित होतो तेव्हा त्या ठिकाणी हनुमानला राम जेव्हा प्रथमच रडताना दिसतात तेव्हा त्याला समजते की लक्ष्मणाने रामाची किती सेवा,भक्ती केली होती. तेव्हा तो म्हणतो की आजपर्यंत मी स्वतःला रामाचा सर्वश्रेष्ठ भक्त समजत होतो,पण लक्ष्मणाच्या भक्ती पुढे मी तर काहीच नाही.तर अशा या लक्ष्मणापुढें सुद्धा राम कृतज्ञता व्यक्त करतो.लहान भावाचे काय आभार मानायचे असा अहंकार रामाच्या मनात येत नाही हीच रामाची थोरवी आहे.राम लक्ष्मणाला वरदान देतो की या जन्मात तू लहान भाऊ म्हणून माझी इतकी सेवा केली,पुढील अवतारात मी तुझा लहान भाऊ होईल आणि आपल्याला माहीतच आहे की कृष्ण अवतारात बलराम मोठा भाऊ तर कृष्ण लहान भाऊ होते.
तर कृतज्ञता व्यक्त करून दाखवणे हा असा सद्गुण आहे जो ज्याचे आपण आभार मानतो त्याला खूप सुखावून जातो,केलेल्या कष्टाचे,त्यागाचे चीज झाल्याचे त्याला समाधान मिळते आणि तो कायमस्वरूपी आपला मित्र,हितचिंतक होऊन जातो.ज्याने आपली मदत केली तो छोटा आहे की मोठा,जवळचा आहे की दूरचा,आपला अहंकार किंवा संकोच बाजूला ठेवून आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा त्याच्या लेखनात जागोजागी आपले मोठे भाऊ आणि गुरू निवृत्ती नाथ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण !
दिधले संपूर्ण माझे हाती ।
किंवा
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझे हाती ।।
ज्ञानदेव महाराज म्हणतात की माझे जे काही ज्ञान आहे ती सर्व गुरू निवृत्ती नाथ यांची कृपा आहे। आणि ज्ञानेश्वरांच्या या गुणांमुळेच आज ८०० वर्षे झाली तरी त्यांची कीर्ती आजही सर्वत्र पसरत आहे,आजही लाखो लोक कितीतरी अंतर पायी चालत ज्ञानोबा माउलीना भेटायला दरवर्षी आळंदीला जातात.
।। जय श्रीराम ।।
ताजी माहिती - श्रीराम मंदिर बांधणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर मोदींनी फुलांचा वर्षाव करून कृतज्ञता व्यक्त केली.
लेखक
सुहास सदाशिव सांबरे
दि. 22/01/2024.
Comments
Post a Comment