मी मात्र अपात्र ठरलो नाही
मी मात्र अपात्र ठरलो नाही.
सध्या विनेश फोगट यांच्या अपात्र होण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे, ज्यादा वजन गट मधून कमी वजन गटात भाग घेतला,फायनल मध्ये थोडे वजन जास्त भरले आणि ऑलिम्पिक समितीने त्यांना अपात्र घोषित केले आणि आपले खात्रीने मिळणारे गोल्ड मेडल गेले असा दुर्दैवी प्रसंग घडला
. त्यावरून मला माझी लहानपणी ची एक गंमत आठवली ज्यात मी सुद्धा असा प्रकार केला होता.
तेव्हा मी झरेकाठी या गावी इयत्ता चवथी मध्ये शिकत होतो.एकदा माझे वडील मला आमच्या मूळ गावी उंबरीला घेऊन गेले.असंच एकदा दुपारच्या वेळी आमचे आजोबा मला शाळेबद्दल विचारू लागले आणि म्हणाले की झरेकाठी पेक्षा आमच्या उंबरीच्या शाळेतील मुलं जास्त हुशार आहेत.मी मान हलविली आणि गप्प बसलो. मी अजिबात चिडलो नाही हे पाहून आजोबा मला परत म्हणाले की चल तुला इथल्या शाळेत घेऊन जातो,वर्गात गुरुजी तुझी परीक्षा घेतील, मग बघू तू किती हुशार आहे? सांग तू कितवीत आहे म्हणजे आपण त्या वर्गात जाऊ.
माहीत नाही मला अचानक त्या एवढ्या लहान वयात ही आयडिया कशी सुचली,मी एक वर्ग कमी म्हणजे तिसरीत आहे असे आजोबांना सांगितले. मग ते मला तिसरीच्या वर्गात घेऊन गेले आणि तिथल्या गुरुजींना सांगितले की या आमच्या नातवाची अवघड प्रश्न विचारून परीक्षा घ्या.आता चवथी चा मुलगा तिसरीच्या मुलांना कसला ऐकतोय ? त्या गुरुजींनी कुठलाही प्रश्न विचारला की त्या सर्व मुलांच्या आधी मीच फटाफट उत्तरं देऊ लागलो. त्यामुळे आजोबांचा मला चिडवायचा प्लॅन फसला आणि ते गुपचूप मला परत घरी घेऊन आले.
त्यानंतर त्यांनी मला पुढे दहावीचा निकाल लागला तोपर्यंत एकदाही माझ्या अभ्यासाबद्दल विचारले नाही. त्यामुळे मी तिसरीत नसून चवथीत होतो हे त्यांना न कळल्यामुळे मी अपात्र ही घोषित झालो नाही,नाहीतर तेव्हा चांगलाच मार खावा लागला असता.दहावीच्या निकालानंतर आजोबा आणि माझ्यात जे काही झालं ते अजून इंटरेस्टिंग आहे,ते पुढच्या लेखात.
Comments
Post a Comment