खरा मित्र ज्ञानदेव
माझं बालपण आणि सातवी पर्यंत चे शिक्षण झरेकाठी या निसर्गरम्य गावात गेलं.मी सहावीत शिकत असताना एक अशी घटना घडली जी मी कधीच विसरू शकणार नाही. माझे आईवडील दोघेही शिक्षक होते आणि आमच्या शाळेची वेळ सकाळी 7.30 ते 10.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशी असायची. माझ्या वर्गात तीस विद्यार्थी होते पण ज्ञानदेव खंडोबा वाणी हा माझा सर्वात जवळचा आणि शाळेतील एकमेव मित्र होता. त्याचे घर शाळेपासून खूप दूर बिबाई च्या डोंगराच्या पायथ्याशी होते,घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती. तो सकाळीच त्याचा जेवणाचा डबा घेऊन यायचा आणि दुपारी रोज आमच्या घरी थांबायचा. मग दुपारी आम्ही आमच्या घरी बरोबर जेवायचो,अभ्यास करायचो आणि खेळायचो.तसा तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता,कारण मला लवकर चार वर्ष वय असताना शाळेत घातले होते. माझा लहान भाऊ हेमंत उर्फ सोन्या तेव्हा दुसरीत होता.त्याला 9 वाजता चहा कम्पल्सरी लागायचा,आणि नाही मिळाला तर खूप रडायचा . आणि चालत जायचे म्हटले आमचे घर शाळेपासून दहा मिनिटांवर होते,त्यामुळे मधल्या वीस मिनिटांच्या सुट्टीत घरी जाऊन सोन्याला चहा पाजून आणणे आईला शक्य नसायचे.मग ती कामगिरी मी आणि ज्ञा...